नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व ? ओळखा बरे मी कोण बोलत आहे ? “काय ” म्हणता?, नाही ओळखले ठीक आहे एक कोडेच घालतो तुम्हाला ” हिरवागार शालू नेसून, नित्य उभा मी सर्वांसाठी , ऊन वारा पाऊस झेलत, फळे फुले देतो तुम्हासाठी .’ आता ओळखले ना ? मी तुमचे लाडके झाड.
मानवजातीची हाव पाहून माझा जीव घुसमटत आहे. म्हणूनच आज न राहवून मी तुमच्यासोबत बोलायला सज्ज झालो आहे. आमच्याशिवाय सजीव सृष्टीची कल्पना करणे देखील अशक्य आहे .
मानवाचे जीवन पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. मानवास जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न वस्त्र निवारा आणि , ऑक्सिजन या गरजा फक्त आणि फक्त आमच्यामुळेच पूर्ण होतात यावरूनच आमचे मानवी जीवनातील महत्व अधोरेखित होते. पृथ्वीवरील ऋतचक्राचे संतूलन सद्धा. आमच्यामुळेच टिकून राहते.
आम्ही सूर्यप्रकाश, हरितलवके, कार्बनडाय ऑक्साइड यापासून अन्न तयार करतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो. हा प्राणवायू घेऊनच सजीव सृष्टी जगू शकते. तसेच आमच्यामध्ये वेगवेगळे औषधी गुणधर्म असतात.
याशिवाय घरा घरात कपाट, दरवाजे, टेबल, खुर्ची इत्यादी वस्तू देखील आमच्यापासूनच बनवल्या जातात. तुम्ही जी पुस्तके वाचतात, ज्या वहीवर लिहतात तो कागद सुद्धा माझ्यापासूनच तयार होतो. तुम्हा सर्वांना गोड, स्वादिष्ट फळे आणि रंगेबेरंगी सुगंधी फुले सुद्धा मीच देतो .
गुरे, वासरे पशु पक्षी आणि तुम्हालासुद्धा उन्हापासून वाचण्यासाठी सावली मीच देतो. अशा प्रकारे अनेक अमूल्य गोष्टी मी निस्वार्थीपणे आपल्याला मोफत देत आहे.
तुमच्याकडे काहीही मागितले नाही आजवर मी परंतु आज हक्काने बजावून तुमच्याकडे मी काही मागणार आहे.
ते मागणे सुद्धा माझ्यासाठी नाही तर तुमच्याच भल्यासाठी आहे. तुम्ही आजवर तुमच्या स्वार्थासाठी माझ्यासारख्या हजारो झाडांची बेसुमार कत्तल केली . पण त्यामुळे तुम्हा मानवाच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे . म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे आता तरी वृक्षतोड थांबवा. तुमची हाव कमी करा कमी गरजा ठेवून निसर्गाभिमुख जीवन जगा वैयक्तिक, सामाजिक आणि शासकीय प्रयन्नातून जास्तीत जास्त वृक्षारोपण करा.
फक्त फोटो काढण्यापूरते वृक्षारोपण न करता प्रत्येकाने किमान दरवर्षी एक झाड लावून ते जगवले पाहिजे. लक्षात ठेवा तर तुम्ही आम्हाला जगवले तरच तुम्ही व तुमची भावी पिढी निरोगी सुदृढ आयुष्य जगू शकतील. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सावध व्हा. आम्ही जगलो तरच तुम्ही जगणार हे विसरू नका.